Wednesday, September 21, 2011

त्याला मी सतत शोधत राहतो....

टप टपताना थेंब पावसाचे मी दुरूनच पाहतो,
तो मात्र थेबांमध्ये चिंब भिजून जातो.
पडता थेंब चिखलाचे अंगावर मी त्रासून जातो,
तो मात्र त्या पाण्यात उड्या मारत जातो.
मी भिजू नये म्हणून छत्रीचा सहारा घेतो,
तो मात्र सर्व झुगारून मनसोक्त भिजत राहतो.
मी एकटाच सर्वाना दुरून पाहतो,
तो सर्वांच्या गप्पांमध्ये मिसळून जातो.
मी सर्व समस्यांचा विचार करतो,
तो हसतो आणि सारे काही विसरून जातो.
मी आठवतो कुणा तरी,
तो मात्र त्याच्या आठवणीत राहतो.
नसते कुणी जेव्हा मी उदास होऊन जातो,
तो शिळ घालत मित्रांबरोबर चालत जातो.
मी अन तो वेगळा नाही, पण तो अन मी वेगळा होतो,
माझ्यातीलच त्याला मी सतत शोधत राहतो.